पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.


दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार काल 27 मे रोजी ग्राम पंचायतींसाठीही मतदान झालं.

मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावली जाते. मात्र पालघरमध्ये दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या मतदारांची ओळख पटावी, यासाठी निवडणूक आयोगाने, लोकसभा पोटनिवडणुकीसाठी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याचे आदेश दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगास अन्य बोटाला शाई लावणेबाबत (डाव्या हाताच्या मधल्या बोटाला) मंजुरी देण्याची विनंती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी केली होती.  त्याअनुषंगाने 22-पालघर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावणेबाबत,भारत निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

पालघर पोटनिवडणूक

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.