पालघर : भाजप आणि शिवसेनेत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्य लढत रंगणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा पोटनिवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवार) दिवसभर पालघर दौऱ्यावर असून त्यांच्या दोन सभा होणार आहेत.
सर्वच पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत. डहाणू तालुक्यातील कासा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री वसई येथे प्रचारसभा घेतील.
दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेकडून चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा मैदानात आहेत. तर त्यांचा सामना काँग्रेसमधून भाजपात आलेल्या राजेंद्र गावित यांच्यासोबत होणार आहे.
शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर सध्या भाजप आणि शिवसेनेकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु आहे.
भाजपसाठी भंडारा-गोंदिया आणि पालघरची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. कारण, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. भाजपचं लोकसभेतील संख्याबळही घटलं आहे. त्यामुळे या दोन जागा राखण्याचं भाजपसमोर आव्हान आहे.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.
पालघर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, मुख्यमंत्रीही मैदानात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 May 2018 01:00 PM (IST)
मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसा पोटनिवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवार) दिवसभर पालघर दौऱ्यावर असून त्यांच्या दोन सभा होणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -