Palghar Crime Update: शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील वाडा (Palghar Wada News) येथे समोर आली आहे. एका शिक्षकाने वाडा येथील सुरू असलेल्या खाजगी कोचिंग क्लासमधून ( Coaching Class) मुलीला काढल्याने कोचिंग क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने चक्क एका चिमुकल्या मुलीचंच अपहरण केलं. मात्र पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या बारा तासात या मुलीचा शोध घेण्यात आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलीस प्रशासनाला यश आलं आहे.
समीर ठाकरे हा शिक्षक वाडा येथे चाणक्य कोचिंग क्लासेसच्या नावाने खाजगी क्लासेस घेत होता. याच खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीनं प्रवेश घेतला. मात्र पीडित मुलीचे वडीलही शिक्षक असल्याने त्यांनी काही दिवसातच या मुलीला खाजगी कोचिंग क्लास सोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितल्यानंतर या मुलीनेही खाजगी कोचिंग क्लासमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र याचाच राग मनात धरून वाडा येथे चाणक्य कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या आरोपी शिक्षकाने या मुलीचं अपहरण केलं.
शिक्षण विभागातील प्रकरणांशी संबंध, पोलिसांना संशय
एका कारमधून या मुलीला उचलून नेत वाडा तालुक्यातील ऐनशेत येथील एका फार्म हाऊसच्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं. आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचे लक्षात येताच वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पालघर पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि अवघ्या बारा तासात या चिमुकल्या मुलीची सुखरूप सुटका करून आरोपींच्याही मुसक्या आवळल्या. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून दोन आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून सुरू आहे . तर दुसरीकडे या प्रकरणाचा काही वेगळा छडा लागतोय का? याचा तपास पालघर पोलीस करत आहेत. तर शिक्षण विभागात जी काही प्रकरण घडत आहेत. त्या बाबतीत ही पोलिसांना संशय असल्याचं म्हटलं आहे.
बिल्डिंगच्या आवारातून मुलीचं अपहरण
पीडित मुलगी आपल्या घरी परतत असताना तिच्या बिल्डिंगच्या आवारातून तिचं अपहरण करण्यात आलं. आपल्या खाजगी कोचिंग क्लासमधून मुलीला काढल्याचा राग खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या शिक्षकाच्या मनात असल्याचा दावा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. आपल्या मुलीची अवघ्या बारा तासात सुखरूप सुटका केल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून समाधान आणि पोलीस प्रशासनाचे आभार देखील मानले आहेत.
अवघ्या बारा तासात पीडित मुलीची सुटका
अवघ्या बारा तासात पीडित मुलीची सुटका करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आलं असलं तरी एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाच्या मुलीचे केलेले अपहरण करणं ही बाब धक्कादायकच आहे. त्यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना असून खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांविरोधात सध्या संताप व्यक्त केला जात आहे.