पालघर : पालघर जिल्ह्यातलं वातावरण सध्या एखाद्या हॉरर फिल्मपेक्षा कमी नाही. कारण रात्री- बेरात्री, दिवसा-ढवळ्या अगदी कधीही इथल्या जमिनीला थपकाप भरतो. घरादारांना गेलेल्या तड्यांमुळे गावातली माणसं आता घरात रहायला तयार नाहीत.

धानिवडी गावातल्या कोटबीपाड्यातील आदिवासींची घरं ही फक्त नावापुरतीच उरली आहेत. पालघरमध्ये महिन्याभरात 12 भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या रुपात गावकऱ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे.

घरं गेलं, मात्र आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरु आहे. यासाठीच थरथरणाऱ्या जमिनीपासून काही अंतर दूर जाण्याचा मार्ग गावकरी पत्करत आहेत.

तलासरी ,डहाणूत आतापर्यंत झालेला भूकंपाचा घटनाक्रम :-

11 नोव्हेंबर 2018 - 3.2 रिश्टर स्केल

24 नोव्हेंबर 2018 - 3.3 रिश्टर स्केल

1 डिसेंबर 2018 - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केलचे लागोपाठ दोन धक्के

4 डिसेंबर 2018 - 3.2 रिश्टर स्केल

7 डिसेंबर 2018 - 2.9 रिश्टर स्केल

10 डिसेंबर 2018 - 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल असे लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के

20 जानेवारी 2019 - 3.6 आणि 3.00  रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

रोजच्या रोज होणाऱ्या भूकंपाचा अभ्यास केला जात आहे. नवनवीन यंत्रणा बसवल्या जात आहेत. मात्र इथल्या लोकांचे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात उदासीनता दिसून येत आहे.


भूकंपाच्या भीतीने आश्रमशाळेतली हजारो मुलं उघड्यावर शिक्षण घेत आहेत. शाळेची भिंत कोसळली,  ठिकठिकाणी तडे गेले, बंद बोरिंगला पाणीही आलं. रात्री भूकंपाच्या धक्क्याने विद्यार्थी झोपेत ओरडत उठतात आणि याची काळजी दूर असलेल्या पालकांना वारंवार सतावते. विद्यार्थी भूकंपामुळे शाळेत न जेवता शाळेबाहेर उघड्यावर जेवण करतात.

भूकंपाची सवय लागणं वाईट. भूकंपाचे हे धक्के राज्य सरकारला कधी बसणार? हाच सवाल आता इथले रहिवासी जीव मुठीत घेऊन विचारत आहेत.