नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावर संचलन करण्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे. 'छोडो भारत' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ आहे.


सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकार करण्यात आला आहे. 1942 मधील 'छोडो भारत' चळवळ ही यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम आहे.

यंदा महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचं वर्ष आहे. त्यानिमित्ताने यावर्षी सर्वच राज्यांना 'गांधी' हीच संकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यं महात्मा गांधी या संकल्पनेवर आधारित कोणकोणते विषय चित्ररथावर साकारतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.



गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्राने गेल्या वर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता. 2016 साली महाराष्ट्राच्या चित्ररथाचा तिसरा क्रमांक आला होता. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या कार्यावर आधारित चित्ररथ महाराष्ट्राने साकारला होता.