मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा दिवस जस जसा जवळ येत आहे, तसा निवडणूक प्रचारही जोर धरु लागला आहे. आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षातील नेतेही आता प्रचाराच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत. त्यांची सभा आज संध्याकाळी 5 वाजता वसंत नगरी ग्राऊंड वसई पूर्व येथे होणार आहे.
तर भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित केली आहे. योगी आदित्यनाथ यांची सभा आज संध्याकाळी 6 वाजता मनवेलपाडा तलाव विरार पूर्व याठिकाणी होणार आहे.
काँग्रेसनेदेखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचारात उतरवलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे आज दुपारी दीड वाजता मंगल कार्यालय वीर सावरकरनगर नारंगी, विरार पूर्व याठिकाणी सभा घेणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत तर योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी ही प्रचारसभा घेत आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
सर्वच पक्षांसाठी ही पोट निवडणूक चुरशीची असली तरी शिवसेना आणि भाजपने मात्र ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधन झाल्याने पालघरमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे.
एकाच दिवशी सभा
उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांची बुधवारी 23 मे रोजी जाहीर सभा होणार आहे.
नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं आहे.
नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नालासोपाऱ्यात सभा घेत, शिवसेनेसह स्थानिक बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली होती. या सभेसाठीही भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची उपस्थिती होती.
इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला
दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, 23 मे री पोलिंसांच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री आमने-सामने
पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनीही उडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत.
नालासोपाऱ्याला 23 मे रोजी तर तर दुसरी सभा भोईसरला 25 मे रोजी होणार आहे.
पालघर पोटनिवडणूक
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.
संबंधित बातम्या
पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ आमने-सामने
इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला
भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगांची तक्रार
पालघर पोटनिवडणूक: शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळला