लातूर : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश कराड यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. कराडांची माघार ही महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणातली अभूतपूर्व घटना मानली गेली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि रमेश कराड यांनी ठरवून हा डाव खेळला, अशीही चर्चा रंगली. मात्र विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर रमेश कराड यांनी एबीपी माझाला राष्ट्रवादी सोडण्याचं कारण सांगितलं.

''राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उमेदवारी दिली. त्यांच्या आदेशानंतर फॉर्म भरला. पण ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक पैसे मागण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला,'' अशी माहिती रमेश कराड यांनी दिली.

''राजकीय कारकीर्द दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. पंकजांसोबतचं जे नातं आहे, ते रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळे मनाला वाटायला लागलं की कुठे तरी चुकलोय,'' असंही रमेश कराड म्हणाले.

आता कोणत्या पक्षात?

रमेश कराड यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते आता कोणत्या पक्षात आहेत, हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय होता. ''उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पंकजांची भेट घेतली. शिवाय भाजपातील नेत्यांशीही राजकारणाच्या पलिकडची मैत्री आहेच. योग्य व्यक्तीसोबत बोलणं झालं आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत भाजपात काम केलंय आणि भविष्यातही काम करणार'', असं रमेश कराड यांनी सांगितलं.

दरम्यान, ''आपल्याकडच्या मतदारांसह इतर मतदारही भाजपसाठी जोडून दिले,'' असा दावाही रमेश कराड यांनी केला.

''राष्ट्रवादीतला अनुभव सर्वात वाईट''

''राष्ट्रवादीचं अस्तित्व लातूर जिल्ह्यात नगण्य आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मी राष्ट्रवादीत आल्यामुळे खुश होते. पण कार्यकर्त्यांचा आनंद हा क्षणिक होता. कारण, राष्ट्रवादी पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी चालत नाही, नेत्यांसाठी चालतो. जे पैसे मागण्यात आले, ते देणं शक्य नव्हतं, माझे वडील आजही शेती करतात, ते काही कारखानदार नाहीत,'' असं म्हणत रमेश कराड यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केली.

पाहा संपूर्ण मुलाखत


संबंधित बातम्या :


बीडचे राष्ट्रवादीचे नेतेच पक्ष संपवतील : पंकजा मुंडे


रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस


खरा दे धक्का 24 तारखेला कळेल, धनंजय मुंडेंचा इशारा


पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!


उस्मानाबाद- लातूर- बीडमध्ये रमेश कराड यांच्याविरोधात कोण?


आता भविष्यात कुणाला भाऊ मानणार नाही : पंकजा मुंडे


विधानपरिषद निवडणूक: लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला