पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंड भेद वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. कारण मतदारांना पैसे वाटप करणाऱ्यांवर 12 तासानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.


शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी रात्री 2  वा. डहाणू पोलिसात धाव घेतली. पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने, शिवसैनिकांनी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला.

खासदार अनिल देसाई , खासदार श्रीकांत शिंदे , आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा यांच्यासह शेकडो शिवसैनिक डहाणू पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.

जर गुन्हा दाखल झाला नाही, तर पालघर बंदची हाक देऊ, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे .

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लीप सादर 

पैसै वाटप प्रकरणात पोलीस केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करत असल्यानं शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पहाटे 6 वाजेपर्यंत हे नाट्य रंगलं.

त्यामुळे भाजपा आणि शिवसेना वाद प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिघळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

पालघरमध्ये शिवसेनेकडून दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा हे उमेदवार आहेत तर भाजपकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित हे मैदानात आहेत.

त्यामुळे आता शिवसेनेच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.

पैसे वाटणारे भाजपचे कार्यकर्ते?

पालघरमध्ये भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. काल पालघरमधील रानशेत भागात शिवसैनिकांनी काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं. त्यावेळी पैसे वाटणाऱ्यांनी आपल्याला हे पैसे भाजपच्या नेत्यांनी दिल्याची कबुली दिली.

भाजपचे शहराध्यक्ष अशोक अंबोरे यांचेच हे पैसे असल्याचं या तरुणांनी सांगितलं.

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली मात्र गुन्हा दाखल झालेला नाही. भाजपच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर भाजपने हा आरोप फेटाळला असून, शिवसेनेची ही स्टंटबाजी असल्याचं भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय.

 पालघर : शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं, भाजपवर आरोप