परभणी : पाकिस्तानातून भारतात परतलेली गीता सध्या मराठी शिकतेय. मराठी, हिंदी बरोबरच इंग्रजी भाषेचे ज्ञान घेत गणितही गिरवतेय. 27 डिसेंबरला गीता परभणीत आपल्या आईवडिलांच्या शोधात दाखल झाली आणि आईच्या शोधानंतर ती शिक्षण घेऊ लागली आहे. तिच्या या कामासाठी तिला परभणीची पहल फाउंडेशन मदत करत आहे. पहल फाऊंडेशन स्थापन करणाऱ्या सेलगावकर कुटुंबांची ही अनोखी कहाणी आहे. 


तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांनी तब्बल पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधिर गीता कुटुंबियांच्या शोधात परभणीत दाखल झाली आहे. परभणीच्या जिंतुर येथील मीना वाघमारे यांनी गीता त्यांची मुलगी असल्याचा दावा केला, महत्वाचं म्हणजे गीताने सांगितलेल्या काही खुणा ही पटल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबियांची डीएनए टेस्ट होणार आहे. मात्र डीएनए टेस्ट अजुन झाली नसल्यामुळे गीताला इंदोरच्या आनंद सर्व्हिस सोसायटीचे ज्ञानेंद्र पुरोहित यांनी तिला परत इंदोरला न नेता सध्या परभणीच्या पहल फाऊंडेशन मध्येच ठेवलं आहे.


परभणीतील पहल फाउंडेशन गीताचा सांभाळ मागच्या 3 महिन्यांपासून करत आहे. त्याचे संस्थापक डॉ. अशोक सेलगावकर यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा हा मूकबधीर असून त्याचा विवाह मूकबधीर दिपाली धाबे यांच्याशी झाला आहे. दिपाली यांचे आईवडील आणि अशोक सेलगावकर दाम्पत्य हे 2013 ला केदारनाथला सोबत गेले होते. मात्र प्रलयाने दिपाली यांच्या आईवडिलांना परतीची वाट दाखवली नाही. हे दुःख आणि एका बहिणेचे राहिलेले लग्न या दोन्ही गोष्टी दिपाली यांना सतावत होत्या. परंतु, डॉ. अशोक सेलगावकर यांनी दिपाली यांच्या बहिणेचे लग्नही लावले. आपल्या मुलींप्रमाणेच दिपाली यांना कधीही त्यांच्या आईवडिलांची कमी जाणवू दिली नाही. मात्र ही दुसरी घटना दिपालीने पाहिली आणि दिपाली यांना गहिवरून आले. त्या मूकबधिर असल्याने त्यांना व्यक्तही होता येत नाही.


केदारनाथ प्रलयातून बचावल्यानंतर डॉ. अशोक सेलगावकर दाम्पत्याने मुलगा, सून, नातू मूकबधिर असल्याने याच मुकबधिरांसाठी आयुष्य खर्ची घालायचे ठरवले. पहल फाउंडेशन काढून मुलाला शिकवले. आज त्यांचे कुटुंबच जवळपास 350 मुलांना शिकवतं. त्यांच्या हक्कांसाठी झगडणं हे सर्व करतात. महत्वाचं म्हणजे पाकिस्तानातून परतलेली गीता ही यांच्याकडेच आहे. तिचा सर्व सांभाळ हेच करत आहेत. शिवाय तिला मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबर गणिताचे शिक्षणही ते देत आहेत. गीताला तिच्या आईवडिलांचा शोध घेण्यात यांचाही सिंहाचा वाटा आहे. पुढे जिंतुरच्या कुटुंबाशी गीताचा डीएनए जुळला, तिने इच्छा व्यक्त केली तर त्यांच्या स्वाधीन करण्याची तयारी ही त्यांची आहे. 


दरम्यान गीता आणि तिच्या आईच्या डीएनए चाचणीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी लागते. जेव्हा ती परवानगी मिळेल तेव्हा ती डीएनए चाचणी झाल्यानंतरच गीता खरंच वाघमारे कुटुंबाची आहे की, नाही हे स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी गीता स्वतःला शिक्षणामधून समृद्ध करू पाहतेय, हे खरंच कौतुकास्पद आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :