मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) आता राज्यातील नेत्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरुनच आधी शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्याला देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उत्तर दिलं. हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं वक्तव्य शरद पवारांनी व्यक्त केलं. तर ज्यांचे नातेवाईक यामध्ये मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं आणि मत मांडावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Sharad Pawar On Pahalgam Terror Attack : काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, "हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही. पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला."
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शरद पवार काय म्हणाले ते मी ऐकलं नाही. पण ज्यांचे नातेवाईक मारेल गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते. ते काय म्हणाले मी ऐकलं आहे. पवार साहेबांचे ते जर मत असेल तर त्यांनी ते जाऊन ऐकावं."
सरकारने हा हल्ला गांभीर्याने घ्यायला हवा
पहलगाम हल्ल्यानंतर सरकार ज्या काही उपाययोजना करेल त्याला आमचा पाठिंबा असेल असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, "काश्मीरमध्ये जे झालं आहे त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकार सोबत राहिले पाहिजे. इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जो हल्ला केला तो भारताच्या विरोधी आहे. देशाच्या विरुद्ध असं कुणी निर्णय घेते तिथं राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या."
शरद पवार म्हणाले की, "सरकारने हा हल्ला अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आम्ही दहशतवाद मोडून काढला असं सरकारच्या वतीने सातत्याने सांगितलं जात होतं. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. या कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहील."
धार्मिक तेढ वाढेल असं काही घडू नये
शरद पवार म्हणाले की, "अतिरेकानी यापूर्वी देखील हल्ले केले होते. तीन चार घटना घडल्या आहेत, तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती. पण आज धर्माची चर्चा का सुरू आहे? घडलं ते वाईट आहे. देशाला आवाहन आहे धार्मिक आंतर वाढेल असं काही घडू नये.