सोलापूर : वडार समाजाचे देशाच्या बांधणीत मोठे योगदान आहे. या समाजाला आम्ही कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नदेखील आम्ही मार्गी लावणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूरात केली. सोलापूरच्या पार्क मैदानावर वडार समाजाचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

सोलापूरात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाकडून करण्यात आलेल्या मागण्या लक्षात घेत मोठ-मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वडार समाजाला आरक्षण देऊ तसेच वस्त्यांची जागा वडार समाजाच्या नावावर करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

दरम्यान या मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

काय आहेत वडार समाजाच्या मागण्या?
वडार समाजाने मुख्यमंत्र्यांसमोर विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीत सदस्यपद देण्यात यावे, एसटी महामंडळामध्ये आरक्षण देण्यात यावे तसेच ठिकठिणाकी बजरंग बली मारुतीचे मंदिर उभे करावे अशा मागण्या वडार समाजाकडून करण्यात आल्या आहेत.