जळगाव : कौटुंबिक वादातून पत्नी माहेरी निघून गेल्याने एका नवऱ्याने 100 फुटी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली. मनोज शुक्ला असे या 'वीरु'चे नाव आहे. भुसावळ शहरात लिम्पस क्लब परिसरात ही घटना घडली. पत्नी माहेरहून घरी येत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या मनोजची पोलिसांनी समजूत घातल्यानंतर तो खाली उतरला. मात्र दिवसभर शहरात त्याच्या वीरुगिरीचीच चर्चा होती.

भुसावळ शहरातील लिम्पस परिसरात राहणाऱ्या मनोज शुक्ला या तरुणाचा गेल्या तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसातच पतीपत्नीत खटके उडू लागले. पत्नी नेहमीच मनोजला आपण कायमचे माहेरला जाऊ अशा धमक्या देत होती. काही दिवसापूर्वी या दोघा पतीपत्नीत पुन्हा भांडण झाले. सततच्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेल्याने मनोजची चांगलीच पंचाईत झाली.

कितीही समजावून सांगून देखील पत्नी माहेरुन परत येत नसल्याने मनोजला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून मनोज आपल्याच भागातील पाण्याच्या टाकीवर चढला. पत्नी माहेरुन परत येत नाही, तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेत आत्महत्येची धमकी दिली.

यानंतर टाकीभोवती पोलिसांसह मोठी गर्दी जमली. बऱ्याच वेळानंतर पोलीस आणि त्याच्या भावाने पोलिसांच्या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून पत्नीला समज देण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर मनोज खाली उतरला. तब्बल चार तास मनोज टाकीवर चढून बसल्याने त्याची समजूत काढताना पोलिसांच्याही नाकीनऊ आले होते.