आरक्षणाच्या मागणीसाठी धोबी समाजाचं 'कपडे धुवा' आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2018 04:09 PM (IST)
राज्यभरात आज धोबी समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी 'कपडे धुवा' आंदोलन केलं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आज हे आंदोलन करण्यात आलं.
अकोला : आरक्षणाच्या मागणीसाठी आता धोबी समाजही रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरात आज धोबी समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी 'कपडे धुवा' आंदोलन केलं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आज हे आंदोलन करण्यात आलं. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजासह आता धोबी समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य परीट-धोबी आरक्षण कृती समितीनं या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. अकोल्यात झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व कृती समितीचे राज्य अध्यक्ष अनिल शिंदे यांनी केलं. धोबी समाजाच्या सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी निर्माण केलेल्या डॉ. डी.एम. भांडे समितीनं 2001 मध्ये आपला अहवाल राज्य सरकारला सोपवला होता. यात या समाजावर अन्याय झाल्यानं या समाजाला परत अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. सरकारनं त्वरीत हा मुद्दा निकाली काढण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. सध्या देशातील 18 राज्यांमध्ये धोबी समाज अनुसुचित जातीत समाविष्ठ आहे.