उस्मानाबाद : उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी उद्या होणार नाही.


विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर जागेसंदर्भात अचानक झालेल्या कोर्ट केसमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यची सूत्रांची माहिती आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र पाठवूनच मतमोजणी उद्या होणार नसल्याचे कळवले आहे.

विशेष म्हणजे, या जागेची मतमोजणी उद्या नाही, मग नेमकी कधी होईल, याबाबत काहीही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रात दिलेली नाही. त्यामुळे संभ्रम कायम राहिला आहे.

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेची जागा सर्वाधिक चर्चेची राहिली आहे. कारण रमेश कराड यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीकडून या जागेसाठी अर्ज केला होता, मात्र ऐनवेळी अर्ज मागे घेत राष्ट्रवादीलाही आठवड्याभरात राम राम ठोकला. त्यामुळे अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या जगदाळेंना राष्ट्रवादीने आपला उमेदवार मानला.

तर दुसरीकडे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी मंत्री सुरेश धस हे भाजपकडून या जागेसाठी उमेदवार आहेत.

अत्यंत चुरशीची अशी उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक मानली जात आहे. या जागेवर कोण बाजी मारतं, याचा उद्या निकाल लागणार होता, मात्र मतमोजणी पुढे ढकलल्याने आता कधी निकाल लागेल, याबाबत कोणतीही ठोस माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप देण्यात आलेली नाही.