सांगली : शेतीचं कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्यावर चक्क भीक मागण्याची वेळ आली आहे. मुंबई लोकलमध्ये शेतकरी नारायण पवार भीक मागताना पाहायला मिळत आहे.


नारायण पवार हे मूळचे सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. त्यांनी पाच एकराची शेती फुलवण्यासाठी बँकेतून पाच लाख रुपयांचं कर्ज घेतलं. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्या फळबागा वाळून गेल्या.

कर्जाचा हप्ता आणि वाढलेलं व्याज यामुळे पवार यांच्यावर तब्बल 39 लाखांचं कर्ज झालं. अशा परिस्थितीत नारायण यांच्या मनात आत्महत्या करण्याचा पर्याय डोकावला. मात्र घरी असलेली आई, पत्नी आणि मुलाच्या काळजीपोटी आत्महत्या करण्याचा अविचार सोडून त्यांनी मुंबईला जाऊन भीक मागण्याचा निर्णय घेतला.

गेल्या महिन्याभरापासून नारायण पवार हे मुंबईतल्या लोकलमध्ये भीक मागत होते. सध्या ते सांगलीला पोहचले असून त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.