उस्मानाबाद : शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यातल्या मुलांचा उत्साह, आनंद ओसंडून वाहत असताना उस्मानाबादमध्ये घुगीच्या मुलांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे.


घुगी गावातल्या सरकारी शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दत्तक घेतलेली ही शाळा.

इथं ना बसायला नीट खुर्च्या नाहीत. डोक्यावर छत नाही... चक्क पत्र्यांच्या खोलीत शाळा भरते. दोन वर्षापूर्वी झालेल्या वादळात शाळेचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळेची पाहणी केली.
तात्काळ एक कोटींचा निधी मंजूर केला. दोन वर्षे उलटली. मात्र शाळेच्या इमारतीची एक वीटही रचली नाही.

शिक्षणमंत्र्यांना वारंवार आठवण करुनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गावकऱ्यांनी पै-पै जमा केली आणि पत्र्याचं शेड उभारलं. उन्हाळ्यात तर चक्क गोठ्यात शाळा भरवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती.

सध्या या शाळेत 128 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सात वर्गांसाठी सध्या चार पत्र्याचे शेड आहेत. त्यातल्या एका शेडमध्ये किचन आहे. त्यातच वर्गही भरवावा लागतो.

सारे शिकूया... पुढे जाऊया असा नारा मायबाप सरकार देतं. मात्र प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत सोई-सुविधाही मिळत नसतील तर हे चिंताजनक आहे. किमान शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी यात लक्ष घालून शाळेचं बांधकाम पूर्ण करावं म्हणजे झालं.