ऑर्डनन्स फॅक्टरीत खासगीकरण आणल्याने कामगारांचे भविष्य अंधारात येईल, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दारुगोळा निर्मितीसाठी देशभरात 41 ऑर्डनन्स फॅक्टरी असून त्यात सुमारे 90 हजार कर्मचारी काम करत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून या फॅक्टरीजच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. याला ऑर्डनन्सच्या कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आजपासून देशभरातल्या सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीतले कर्मचारी एक महिन्याच्या संपावर गेले आहेत. त्यामुळे दारुगोळा निर्मितीचं काम ठप्प झालं आहे.
अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत मिसाईलचे फ्यूज कंडक्टर, बंदुका यासोबतच काडतुसं, हॅन्ड ग्रेनेड यांची आवरणं तयार केली जातात. मात्र सुरक्षेच्या बाबतीत अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या या विभागाचं खासगीकरण केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांसह डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सनी ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या बंदनंतरही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यापुढे बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
व्हिडीओ पाहा