School Reopen : राज्यामध्ये हळूहळू कोरोना रुग्णसंख्येचा वेग कमी होताना दिसत आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. परभणी जिल्ह्यात 31 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काढले आहेत. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातही 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी अशाही सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा होणार सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वच जिल्ह्यांतून शाळा सुरू करण्याचे आदेश काढण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात पाचवी ते सातवी पर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून तर 1 ली ते 4 थी पर्यंतच्या शाळा 7 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर, परभणी बरोबरच चंद्रपूर जिल्ह्यातही सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा होणार सुरु होणार आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. 25 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये शाळा सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती. याच बैठकीच्या निष्कर्षांच्या आधारावर शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. 1 ली ते 8 वीचे वर्ग एका आठवड्यानंतर स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरू करण्याबाबत घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना नियमावलीचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातही 31 जानेवारीपासून पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी दिले आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे पाऊण महिने बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबणार आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सहा जानेवारी पासून पहिली ते आठवी वर्गाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तर 12 जानेवारीपासून नववी ते बारावी वर्गाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑफलाईन शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. परंतु ऑनलाईन नको ऑफलाईन शाळा सुरू करा, अशी मागणी शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन समित्या व पालकवर्ग यांच्यातून होत होती. त्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांना निवेदने सुद्धा देण्यात आली होती. त्यानुसार पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने 20 जानेवारी रोजी आदेश काढत पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बंद असणाऱ्या शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- 31 जानेवारीपासून सिंधुदुर्गात पुन्हा शाळांची घंटा वाजणार, शिक्षकांना RT-PCR बंधनकारक
- Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मात्र मृतांचा आकडा शंभरी पार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI