Coronavirus Mask Free : महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? याची चर्चा सुरु झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे.


वाईनच्या सुपर मार्केटमधील निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीसांकडून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण ते सध्या प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, अशी प्रतिकिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी टीईटी घोटाळ्याबाबत बोलण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान कारच्या पंक्चरबाबतच्या प्रश्नावर ते चांगलेच नाराज झाल्याचं यावेळी बघायला मिळाल. नाशिकमध्ये एमटीडीसीच्या ग्रेप रिसोर्टवर ठाकरे यांची शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.   


नाशिक दौऱ्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? 
सावरपाडा शेंद्रीपाडाची परिस्थिती बघून ते चित्र बदलायाला पाहिजे असं ठरवलं, मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्याशी बोललो, पुढील तीन महिन्यात 13 गावांत आपण पाणी देऊ शकू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पर्यटन विभागाची बैठक झाली. नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ. उड्डाणपुलाची अलाईनमेंट बदलून एका वटवृक्षाला आम्ही वाचवू. तसेच 490 मधून पाच-सहा झाडांनाच हाणी बसेल असा प्लॅन बनवण्यास सांगितले आहे. आज नाशिक क्लायमेट ऍक्शन लॉन्च केला आहे.  


गाडी पंक्चर प्रकरणार -
आपण चालत गेलो आणि स्टेजवर असताना गाडी पंक्चर झाली. पाच मिनिटांत तो रिपेअर पण झाले. बातमी कशी चालली मला कळली नाही. कुठच्या हेतूने बातमी चालवली माहीत नाही, ती खोटी चालली. आपण कामासाठी चालत गेलो, गाडी दाखवण्यासाठी नाही.  महत्वाची गोष्ट आहे की, कामावर फोकस होणे गरजेचे आहे.   


झाडे दिसली का नाहीत ?
नाशिकमध्ये उड्डाणपूलाच्या सल्लागाराने महापालिकेकडून पाच कोटी घेतले पण त्यांना ही झाडे दिसली का नाही ? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी खूप शहरात बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना आपण झाडांकडे बघतच नाही. पण आपण अनेक झाडे वाचवली आहेत. नदीची पात्रे असेल किंवा झाडांची गोष्ट याकडे प्लॅनिंगच्या हिशोबाने होणे गरजेचे आहे. शाश्वत विकास करताना झाडांचा विचार करणे गरजेचे आहे.' 


मास्क अनिवार्यच -
आजपर्यंत आपण एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार चालत आलो आहोत. WHO ने अजूनही कुठलाही व्हेरियंट स्ट्राँग आहे की कमकुवत हे सांगितले नाही. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठीचे सगळ्यात चांगले शस्त्र आहे, लसीकरणही महत्वाचे आहे. मास्क हे आता घालणे गरजेचेचं आहे. पुढे WHO च्या निर्देशानुसार पाहूयात. 


उत्तर प्रदेशला प्रचाराला तुम्ही जाणार ?
गोव्यात आधी गेलो होतो. उत्तर प्रदेशचा इतिहास माहीत नाही पण मी जाणार आहे. शिवसेना म्हणून गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये लढणार आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पर्याय आहेत ते आम्ही बघू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.