Sindhudurg School Reopen : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालयांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातही 31 जानेवारीपासून पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी दिले आहेत.  मात्र त्यापूर्वी सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे पाऊण महिने बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबणार आहेत.


जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सहा जानेवारी पासून पहिली ते आठवी वर्गाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तर 12 जानेवारीपासून नववी ते बारावी वर्गाच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑफलाईन शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. परंतु ऑनलाईन नको ऑफलाईन शाळा सुरू करा, अशी मागणी शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन समित्या व पालकवर्ग यांच्यातून होत होती. त्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांना निवेदने सुद्धा देण्यात आली होती. त्यानुसार पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने २० जानेवारी रोजी आदेश काढत पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या.  मात्र त्यावेळी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नियमित 200 च्या पुढे मिळत होते. मात्र अलीकडे चार दिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पुन्हा शाळा सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्याप्रमाणे शिक्षणाधिकारी शेख यांनी आज आदेश काढत जिल्ह्यातील बंद असलेल्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा पुन्हा 31 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 31 जानेवारी पासून जिल्ह्यातील शाळा गजबणार आहेत.