Rain Update : पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.


सखल भागांमधून पाणी हळू-हळू कमी होताना दिसत आहे


दरम्यान, काल रात्री झालेल्या पावसानंतर मुंबईतील अनेक भागात काही काळ पाणी साचलं होतं, पण पाऊस थांबताच पाणी देखील ओसरलं आहे, काल बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मुसळधार पावसानंतर पाणी साचले होते, तर सायन पश्चिमेकडील रोड क्रमांक 6 वर पाणी साचले होते, सेल कॉलनी रोड चेंबूर वांद्रे सायन टी जंक्शनजवळ देखील पाणी साचलं होतं. मुंबईत मध्यरात्री झालेला मुसलाधार पावसामुळे मुंबईच्या सखल भाग असेलेल्या अंधेरी सबवे, बांद्रा सायन मुख्यमार्ग, चेंबूर, सायन गांधी मार्केट, या सर्व परिसरामध्ये पाणी भरला होता. मुंबईत बांद्रा सायन रोडवर दीड ते दोन फूट पाणी भरले आहे, सध्या मुंबईत पाऊस थांबला आहे आणि सर्व सखल भागांमधून पाणी हळू-हळू कमी होताना पाहायला मिळत आहेत,


 






 


या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. याबरोबरच 6 आणि 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


 






 


 






 


मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत


दरम्यान, सध्या मुंबईमध्ये पाऊस बरसत असून त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक काल 20 मिनिटांने उशिराने सुरु होत्या. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पासवाचा परिणाम झाला आहे. 


मच्छीमारांसाठी इशारा
मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा सागरी किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर आज मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


मुख्यमंत्र्यांचे निर्देश


रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.



जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 
रत्नागिरीत देखील काल मुसळधार पाऊस झाला. लांजा तालुक्यातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली.  तर मंडणगड तालुक्यालाही पावसाने चांगलच झोडपलंय, तालुक्यातील भिंग्लोली आणि समर्थनगर येथे पावसाचे पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जगबुडी आणि काजळी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे.