मुंबई : वेगळा विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आलेलाच नाही. तो निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, तर केंद्राचा असतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.   तसंच मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेवरही हल्लाबोल केला. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांचं नाव घेऊन, मुख्यमंत्र्यांनी आपण अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचं ठणकावून सांगितलं.   भाजपची पहिल्यापासून छोट्या राज्यांची भूमिका, तर शिवसेनेची सुरुवातीपासून अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. मात्र आम्ही युती सरकार म्हणून सत्तेत असलो, तरी वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावाच नसल्यामुळे, ही चर्चा इथेच थांबवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे सांगितलं.   मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर अखंड महाराष्ट्रासाठी आंदोलन, घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. तीच वेळ साधून विरोधकांनी शिवसेनेला घेरलं.   विरोधी पक्षांनी शिवसेनेना टोमणे देणाऱ्या घोषणा दिल्या. 'कहा गयी कहा गयी शिवसेना कहा गयी',  'वाघाचं काय झालं, शेळी झाली शेळी झाली',  'या वाघाने काय खाल्लं, काय खाल्लं, गवत खाल्लं गवत खाल्लं, या सिंहाने काय खाल्लं वाघ खाल्ला खाल्ला' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.   मुख्यमंत्र्यांची भूमिका संधिग्द मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध आहे. त्यांनी अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.   शिवसेना आमदार 'मातोश्री'च्या दिशेने दरम्यान, अखंड महाराष्ट्र मुद्दयावर मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील निवेदनानंतरही शिवसेना समाधानी नाही. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे विधान भवनातून मातोश्रीकडे निघाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अखंड महाराष्ट्राबाबत चर्चा करणार आहेत. अखंड महाराष्ट्रच्या मुद्दयावर शिवसेना ठाम आहे.

संबंधित बातमी

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस