मुंबई : मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आलेलाच नाही. तो निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, तर केंद्राचा असतो. भाजपची पहिल्यापासून छोट्या राज्यांची भूमिका, तर शिवसेनेची सुरुवातीपासून अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. मात्र आम्ही युती सरकार म्हणून सत्तेत असलो, तरी वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावाच नसल्यामुळे, ही चर्चा इथेच थांबवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात विदर्भाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजप आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी केल्याने, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत, अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या.
तसंच मुख्यमंत्री आणि भाजप सरकराने स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जर त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडून विदर्भ वेगळा करायचा असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, मग मागणी करावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं.