मुंबई : शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली.
सभागृहात सरकारने मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन संघर्षयात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.
शिवसेनेवर टीकास्त्र
दरम्यान विरोधकांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. शिवसेनेने कर्जमाफीसाठी नव्हे, तर विमानवाऱ्या करण्यासाठी वेळ घालवला, असा आरोपही विरोधकांनी केला.
शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेना वारंवार सोयीनुसार भूमिका बदलत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी विधानभवनापासून रस्त्यापर्यंत संघर्ष सुरू असताना राज्यात शिवसेना मंत्रिमंडळ फेरबदलात तर संसदेत त्यांच्या खासदारांची विमान प्रवासबंदी उठवण्यासाठी वाद घालण्यात व्यस्त होती. शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीपेक्षा आपल्या खासदाराची विमानवारी महत्वाची वाटली. त्यासाठी त्यांनी संसदेत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची कॉलर पकडण्याचं धाडस दाखवलं. पण शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांची कॉलर पकडण्याचं धाडस शिवसेनेला दाखवता आलं नाही. यावरुन त्यांचा शेतकऱ्यांप्रतीचा कळवळा बेगडी असल्याचं स्पष्ट होते, असा आरोप विखे पाटलांनी केला.