मुंबई : समृद्धी हायवे किंवा बुलेट ट्रेनवर टीका करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. “आपल्याला रस्त्याने यावं लागत नाही, आपल्यासाठी विमानाची सोय आहे. हा लोकांसाठीचा रस्ता आहे.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते.


“समृद्धी हायवेसाठी आम्ही 40 हजार कोटी आणि बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी सरकार खर्च का करता, असं तरुण आणि उमदे नेते विचारत आहेत. लोकांना वाटतं काय नालायक सरकार आहे. इतके पैसे खर्च करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. पण नारायण राणेंना विचारा, त्यांचा अर्थकारणावर अभ्यास चांगला आहे. आपल्याला रस्त्याने नाही यावं लागत, आपल्याला विमानाची सोय आहे. हा लोकांसाठीचा रस्ता आहे.” असं उत्तर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिले.

“सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना पराभूत व्हावं लागलं. त्यानंतरच कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला. EVM मध्ये घोटाळा झाला असं आम्हालाही वाटलं होतं, तुम्हाला ही वाटणार. सत्य पचवायला आणि हार स्वीकारायला वेळ लागतो. होईल सवय.”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. त्याचवेळी, कर्जमाफी लढा तुम्ही तीव्र केला, पण जिल्हा परिषद निवडणुकीत पडल्यावरच का मोठा केला?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला.

राज्याला पुनर्वसनापासून गुंतवणुकीपर्यंत नेले पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार नाहीत. राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आवाक झाली आणि शेतकऱ्यांना फायदा झाला. तुरीचं उत्पन्न 4.44 लाख मेट्रिक टन पासून 20 लाख मेट्रिक टन म्हणजेच पाच पटीने वाढलं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “शेतीत गुंतवणुकीवर आधारित धोरण गेल्या दोन वर्षात राज्यसरकारने आणलं. शेतकाऱ्याला पूर्वी कागदावर हमीभाव मिळत होता. मात्र, आता हे पैसे थेट शेतकऱ्यांचे खात्यात जमा होतात.” शिवाय, नोटाबंदीचा परिणाम शेतमालाच्या आवकीवर झालेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तुरीचं उत्पन्न पाच पटीने वाढलं. इतक्या प्रमाणात उत्पादन वाढलं, पण राज्य सरकारने तूर खरेदी केल्यामुळे भाव पडले नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्याच्या उत्पन्नात चाळीस हजार कोटींची वाढ झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.