नागपूर : सरकार म्हणजे डोरेमॉन आणि जनता म्हणजे नोबिताचं कार्टून झालं आहे, अशी टीका  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. दोन वर्ष उलटूनही सरकारमध्ये कार्यतत्परता नसल्याचंही विखे पाटील म्हणाले.


सरकार म्हणजे डोरेमॉन-नोबिताचं कार्टून झालं आहे. ज्याप्रमाणे डोरेमॉन नोबिताला वास्तवापासून दूर नेतं आणि स्वप्न दाखवतं त्याप्रमाणे हे सरकार करत असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केला.

सरकारला सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीवही नाही, समजही नाही. फक्त वरकरणी घोषणा करायच्या आणि मग यू टर्न घेऊन जनतेची दिशाभूल करायची, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आपलं सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

'आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो आणि सरकार क्लीन चिट देतं. काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे आणि नोटाबंदी लागू केली. काळा पैशासंदर्भात नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा कुठलाही विचार न करता घेतला आहे. तयारीशिवाय घेतलेला नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या मुळाशी येत असल्याचंही विखे पाटील म्हणाले.

शेतकरी आत्महत्येसाठी आमच्या (आघाडी) सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करणाऱ्याची मागणी केली जायची, मात्र आज अनेक जणांचा एटीएम आणि बँकांच्या रांगेत मृत्यू होत आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवालही विखे पाटलांनी उपस्थित केला.

माझ्या जिल्ह्यात 90 टक्के शेतकऱ्यांचे खाते जिल्हा बँकेत आहेत. जिल्हा बँकांना वेठीस धरलं जात आहे. मात्र डीमार्ट, पेटीएम सारख्यांना खुला बाजार सुरु केला आहे. सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचं काम सुरु असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

लतादीदींचं 'गैरो पे रहम, अपनो पे सितम..!!' हे गाणंही या सरकारला लागू होत असल्याचा टोला त्यांनी हाणला. मुख्यमंत्री जरी ओव्हरटाईम मंत्री आहे असं म्हणत असतील तरी नागपूरमध्ये सर्व गुन्हेगार फुलटाईम कामाला लागले आहेत, अशी टीकाही विखे पाटलांनी केली.