पुणे : लाख रुपयांचा कोट घालणारी आणि दिवसातून तीन तीन वेळा कपडे बदलणारी व्यक्ती भावनिक होऊन 'मी फकिर आहे' असं म्हणते, या शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.


आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुका पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. नरेंद्र मोदींच्या करिष्म्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने जनतेमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचंही अजित पवार म्हणाले.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांना त्रास होत आहे, नोटाबंदीच्या समर्थनासाठी निघणाऱ्या मोर्चांना परवानगी देतात, मात्र त्याचा निषेध करण्यासाठी निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देत नाही, अशी टीकाही अजित पवारांनी केली.

'मेट्रोचा प्रकल्प पुढे घेऊन जात आहे. याचा खर्च वाढत चालला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करण्यात येणार आणि नागरिकांना आम्ही काही तरी करत आहोत, असा आभास भाजप नेते निर्माण करत आहेत.' असंही अजित पवार म्हणाले.

पुणे शहराचा डीपी राज्य शासनाकडे आहे. मात्र त्याच्यावर निर्णय घेतला जात नाही. भाजपच्या आमदाराकडून त्यात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. या सरकारकडून काही विशिष्ट लोकांसाठी डीपी तयार केला जात असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला.

अजित पवारांचे इच्छुक उमेदवारांना डोस

'योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील, इतर पक्षाचा समोरचा उमेदवार बघून इच्छुक निर्णय घेतात मात्र पक्ष सर्व खबरदारी घेऊनच तिकीट देईल, अनेक जण वेगवेगळे डावपेच आखतात, आमच्याजवळ येऊन वकिली पॉईंट टाकतात, मात्र एक लक्षात घ्या तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात तिथला मी हेडमास्तर आहे, आम्ही काही पतंग नाही उडवत, विटी दांडू नाही खेळत तुमचं काय सुरु असत ते आम्हाला चांगलं कळतं' असे डोसही अजित पवारांनी उमेदवारांना पाजले.