अहमदनगर : अहमदनगरमध्ये शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यावर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. सुदैवाने भोर हल्ल्यातून बचावले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप भोर यांनी केला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवरील भांडणातून हल्ला झाल्याची माहिती आहे. 25 ते 30 जणांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'सकल मराठा समाज महाराष्ट्र' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपपर भोर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करत धमकी देण्यात आली होती, असं म्हटलं जातं.
या धमकीबाबत विचारणा करण्यासाठी गेलं असताना असता रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दळवींनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप भोर यांनी केला आहे. अहमदनगरच्या एकवीरा चौकात दगड आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही भोर यांनी केला आहे.
दरम्यान गोरख दळवी आपल्यावरील आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत. भोर यांनी आपल्याला चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी बोलताना ते व्हिडिओ शूटिंग करत होते. मात्र चर्चा करताना झटापट झाली आणि भोर पडले, तेव्हा त्यांना दुखापत झाली, असा दावा गोरख दळवींनी केला आहे.
भोर यांच्यासोबत 25 जण होते, तर आपल्यासोबत तीन-चारच जण होते, उर्वरित माणसं रस्त्यावरील बघे होते, असा दावाही दळवींनी केला आहे. झटापटीत आपले कपडे फाटल्याचंही दळवींनी म्हटलं आहे.