यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाजपप्रवेशावर टीका केली. 'भारतीय जनता पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःला शक्तिशाली पक्ष म्हणून सांगतात तरीही त्यांना दुसऱ्या पक्षातील लोकांची गरज पडते. याचाच अर्थ भाजपच्या नेतृत्त्वाला आपला पक्ष कमकुवत आहे असं वाटत असावं', असं मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, "राज्यात जरी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता असलो तरीही बीड जिल्ह्यात सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर हे दोघं माझे नेते होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत नसल्याने त्यांचा राजकीय स्वार्थ पुर्ण होऊ शकत नव्हता. त्यामुळे पक्ष सोडून जाताना कोणाला तरी दोष द्यावा लागेल म्हणुन माझं नाव घेण्यात आलं".
इनाम जमिनीच्या कथित बेकायदा खरेदी प्रकरणी सध्या सुरु असलेल्या आरोपांवर मुंडे म्हणाले, "माझ्यावर केलेल्या कुठल्याही आरोपात कसलंही तथ्य नाही. राज्यातील एका विरोधी पक्षनेत्याला त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आहे आता दुसऱ्या विरोधी पक्षनेत्यावर खोटे आरोप करुन दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापूर्वीही सभागृहात मी सांगितलं आहे कि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली माझ्यावरच्या प्रकरणांची चौकशी करावी. मी दोषी आढळलो तर सरकार ठरवेल ती शिक्षा भोगायला तयार आहे".