80 तासाच्या सरकारसंदर्भात पुस्तक लिहिणार
अजित पवारांसोबत 80 तासांच्या सरकारबाबत बोलताना ते म्हणाले की, काही पत्रकारांनी यावर पुस्तकं लिहिली आहेत. मात्र यात खरं काय आहे याबाबत संपूर्ण घटनेचा खुलासा मी करणार आहे. मी ज्यावेळी पुस्तक लिहील, त्यावेळी मी त्यात या गोष्टीचा खुलासा करेल. सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. पण आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. 'राष्ट्रवादी' म्हणजे 'अजित पवार' नाही. मी त्या सर्व चर्चेत होतो. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. त्यानंतर आम्ही शांत झालो. तीन चार दिवस आम्ही कुठलीही हालचाल केली नाही. पण नंतर आम्हाला अजित पवार यांच्याकडून फिगर आली. त्यांनी सांगितलं की, तीन पक्षांचं हे सरकार चालू शकत नाही. म्हणून सकाळी तो शपथविधी झाला.
अजित पवार यांच्याबरोबरच्या सरकारचे शिल्पकार अमित शाह
तो निर्णय चुकीचा झाला. आज तो निर्णय चुकीचा झाला असं वाटतंय. मात्र त्यावेळी ते बरोबर वाटलेलं. ज्यावेळी तुमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसत असेल, त्यावेळी तुम्हाला जगावं लागतं. म्हणून रात्री ठरलं आणि सकाळी शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर ते सरकार टिकलं असतं, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अजित पवार यांच्याबरोबरच्या सरकारचे शिल्पकार अमित शाह होते, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपद गेल्याचं दु:ख झालं
ते म्हणाले की, मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी मला मुख्यमंत्री होईल याची कल्पना होती. मला केंद्रीय नेतृत्वाकडून कळालं होतं. पण या कानाचं त्या कानालाही कळू नये म्हणून कुणालाच सांगितलं नाही. पत्नी, आईलाही सांगितलं नव्हतं. ज्यावेळी मला वाटत नव्हतं त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि ज्यावेळी माझ्यासह सर्वांना वाटत होतं की मुख्यमंत्री होणार आहे, त्यावेळी झालो नाही. याचं दु:ख वाटलंच कारण हे अनपेक्षित होतं. सगळं हाती असताना हे झालं कसं याचं आश्चर्य वाटलं. दहा-बारा दिवस लागले यातून बाहेर येण्यासाठी.
उद्धव ठाकरे यांनी फोनवर बोलायलाही नकार
विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या विरोधातील भाजपच्या बंडखोरांना अर्ज वापस घ्या, म्हणून दिवसभर फोन केले. आणि अनेकांनी घेतले देखील. मात्र शिवसेनेने आम्हाला ऐनवेळी धोका दिला. सरकार असताना पाच वर्ष ज्या व्यक्तीचा शब्द मी पडू दिला नाही. त्या उद्धव ठाकरे यांनी मला नंतर फोनवर बोलायला देखील नकार दिला. जर पटत नसेल तर समोरासमोर बोलावं, मला याचं दु:ख नक्की झालं, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहावं ही माझी क्षमता नाही
माझ्या पाठिशी मोदीजी भक्कमपणे उभे आहेत. अमित शाहांनाही देखील आम्ही अर्ध्या रात्री फोन करतो. भाजपत पिढ्या बदलतात, नेतृत्व बदलतं. देशाच्या राजकारणात आम्हाला रोल प्ले करावाच लागेल. ही चर्चा आता करणं चुकीचं. मी पंतप्रधानपदाची स्वप्न पाहात नाही, असं ते म्हणाले.
'फडणवीस' आडनाव आहे, म्हणून शरद पवारांनी काही भूमिका बदलल्या
फडणवीस यांनी सांगितलं की, 'फडणवीस' आडनाव आहे, म्हणून शरद पवारांनी काही भूमिका बदलल्या, असं देखील ते फडणवीस म्हणाले. राज्यात अनेक पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी मला जातीवरुन टार्गेट केलं. जातीचा अभिमान बाळगण्याचे हे दिवस नाहीत, कर्तृत्वाचा अभिमान बाळगावा, असंही ते म्हणाले.