कुरिअर ऑफिसमधील पार्सलमध्ये स्फोट, तीन जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2018 11:14 PM (IST)
अहमदनगरमधील माळीनगर परिसरात असणाऱ्या मारुती कुरिअरच्या कार्यालयात एका पार्सलमध्ये स्फोट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
अहमदनगर : अहमदनगरमधील माळीनगर परिसरात असणाऱ्या मारुती कुरिअरच्या कार्यालयात एका पार्सलमध्ये स्फोट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्तही समोर येत आहे. मारुती कुरिअर कंपनीमध्ये काही कर्मचारी आज (मंगळवार) रात्री दहाच्या सुमारास एक पार्सल सोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात तीन जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या स्फोटासंबंधी ते अधिक तपास करत आहेत.