पुणे: खरं तर डॉक्टरला देवाचं रुप मानतात. कारण अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचं काम अनेक डॉक्टरांनी केलं आहे. पण गेल्या काही वर्षात काही डॉक्टरांनी फक्त पैसा कमवायचा उद्देश ठेवून रुग्णसेवेचा व्यवसाय मांडला आहे.
'डिसेंडिंग डायग्नोसिस' या पुस्तकातून दोन डॉक्टरांनीच डॉक्टरांच्या काळ्या धंद्याचं वास्तव समोर आणलं आहे. डॉ. अभय शुक्ला आणि डॉ. अरुण गद्रे असं या डॉक्टर-लेखकांचं नाव आहे.
रुग्णांसाठी सेवा देणारे डॉक्टर रुग्णांचे कर्दनकाळ बनत आहेत, त्याचं भीषण वास्तव या डॉक्टरांनी पुस्तकात मांडलं आहे.
गर्भवती नसतानाही गर्भपात, कॅन्सरच्या भीतीने लुबाडणूक अशा अनेक प्रकारातून डॉक्टर रुग्णांची लुबाडणूक करत असल्याचं डॉ. शुक्ला आणि गद्रे यांनी मांडलं आहे.
स्वतः डॉक्टरी पेशात असूनही डॉक्टरांच्यातल्या भ्रष्ट कारभाराला चव्हाट्यावर आणणाऱ्या या दोघांचे भयंकर अनुभव डिसेंटिंग डायग्नोसिस या पुस्तकात मांडले आहेत. ज्यात वैद्यकीय पेशाच्या वर्दीआड रुग्णांना लुबाडणाऱ्या हव्यासी प्रवृत्तीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या पुस्तकाचा जन्मही झाला, तो अशाच एका सुन्न करणाऱ्या अनुभवातून.
"प्रेग्नंट नसतानाही प्रेग्नंट असल्याचं सांगून, एका मुलीची डॉक्टरनेच फसवणूक केली होती. ती तरुणी उपचारासाठी माझ्याकडे आली, मात्र मी तपासणी केल्यानंतर ती प्रेग्नंट नसल्याचं समोर आलं. त्याचवेळी दुसऱ्या डॉक्टरने तिला फसवल्याचं उघड झालं" असं डॉ. अरुण गद्रे यांनी सांगितलं.
6 राज्यांमधल्या 78 डॉक्टरांशी बोलून हे पुस्तक तयार झालं आहे. गद्रे यांनी या पुस्तकामध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या व्यवसायाच्या बाजारीकरणावरही प्रकाश टाकला आहे.
डॉक्टर्सना टार्गेट दिलं जातं... 100 पैकी 10 ते 15 टक्के अँजिओप्लास्टी होत होती.. मॅनेजमेन्टने खडसावलं. 40 ते 50 टक्के का होत नाही.
कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधल्या अशा अनेक सुरस कथा तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील.
रुग्णांना लुबाडण्यात फक्त डॉक्टर्सच नाही, तर त्यांना पॅथॉलीजिस्टचीही त्यांना साथ असते. धक्कादायक बाब म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या तपासण्या या अनेकदा विनाकारणच असतात, असं या पुस्तकातून समोर आलंय.
काय करणार? त्यातही डॉक्टर्सची टक्केवारी ठरलेली असते म्हणे. पण कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधला भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे, की टार्गेट पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेन्ट कोणत्याही थराला जातंय.
ही फक्त काही उदाहरणं होती, पण अख्खं पुस्तक वाचलं, तर देशभरातल्या डॉक्टरांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची मुळं किती खोलवर आहेत, याची प्रचिती येते.
अर्थात, सारेच डॉक्टर असे नसतात. काही डॉक्टर सेवाव्रती आणि आदर्शवादीही असतात, पण त्यांची संख्या दिवसागणिक घटत चालल्याची चिंता हे पुस्तक व्यक्त करतं, जे सर्वात धक्कादायक आहे.
हर्षदा स्वकुळ, एबीपी माझा, पुणे