मनमाड : कांद्याच्या दरात सध्या वाढ होत असून, सहा महिन्यांपूर्वी 800 ते 900 रुपये क्विंटल दराने विक्री होणाऱ्या कांद्याला सध्या प्रति क्विंटल 2400 ते 2500 रुपयांचा दर मिळत आहे. राज्यासह परराज्यात पावसामुळे कांद्याचं नुकसान झाल्याने ही वाढ होत आहे. दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेता आलं नाही. त्यामुळे कांद्याचं उत्पादन तसं कमी झालं. अनेक शेतकऱ्यांनी विकतचं पाणी घेऊन कांदा जगवला. उन्हाळी कांदा हा जास्त दिवस टिकत असल्याने शेतकऱ्यांनी चाळीत तो साठवून ठेवला. तर अनेकांनी तो सुरुवातीला मिळत असलेल्या भावात विकून टाकला. सध्या परिस्थितीला महाराष्ट्रातच नव्हे तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने साठवलेल्या कांद्याचं नुकसान झालं. त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांना बसला. तर पावसाच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे अनेक ठिकाणी नवीन कांदा लागवड उशिरा सुरु झाली आहे. त्यामुळे कांद्याला सध्या मागणी सर्वत्रच वाढली आहे.
सहा महिन्यापूर्वी कांद्याला जास्तीत जास्त 1000 ते 1200 रुपये तर सरासरी 800 ते 900 रुपये दर मिळाला होता. तर दहा दिवसांपूर्वी सरासरी 1400 ते 1500 रुपये क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून मागणी वाढल्याने कांद्याचा जास्तीत जास्त 2500 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर सरासरी दर 2250 ते 2300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये हा दर कमी-अधिक प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणपणे ऑगस्टमध्ये शिल्लक कांद्याची आवक कमी होत असल्याने कांद्याचे दर तेजीत येतात, असं व्यापारी सांगतात.
सध्या कांद्याला चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे कांदा जास्त शिल्लक नाही. त्यातच उष्णतेमुळे कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होऊन तो फेकावा लागला, त्यामुळे सध्या दर मिळत असला तरी त्याचा फारसा फायदा नसल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकूणच परराज्यात कांद्याची मागणी वाढू लागल्याने कांद्याचे दर मात्र दिवाळीपर्यंत चढेच राहणार आहे.
कांद्याच्या दरात वाढ, प्रति क्विंटल 2500 रुपये, दिवाळीपर्यंत दर चढेच राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2019 10:36 AM (IST)
सहा महिन्यापूर्वी कांद्याला जास्तीत जास्त 1000 ते 1200 रुपये तर सरासरी 800 ते 900 रुपये दर मिळाला होता. तर दहा दिवसांपूर्वी सरासरी 1400 ते 1500 रुपये क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून मागणी वाढल्याने कांद्याचा जास्तीत जास्त 2500 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर सरासरी दर 2250 ते 2300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -