चंद्रपूर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून विळ्या-भोपळ्याचे संबंध आहे आणि त्याला मुख्यत्वे या मतदारसंघातील राजकारण कारणीभूत ठरले आहे. जिल्ह्यात चंद्रपूर लोकसभा भाजपकडे तर वरोरा विधानसभा शिवसेनेकडे असं सूत्र ठरलं होतं. मात्र भाजप खासदार हंसराज अहिर हे विधानसभेत शिवसेनेला सुरुंग लावणार आणि शिवसेना लोकसभेत याचं उट्ट काढणार हे अगदी ठरलेलं समीकरण. अहिर विरुध्द धानोरकर या संघर्षामुळे इथे विधानसभेत काँग्रेस सातत्याने जिंकत राहिली आणि काँग्रेसला मदत करण्याच्या नादात भाजप देखील आपला जनाधार वाढवू शकली नाही. या उलट सातत्याने संघर्ष करावा लागल्यामुळे शिवसेनेने आणि पर्यायाने बाळू धानोरकर यांनी स्वबळाची पूर्ण तयारी करून ठेवली होती आणि 2014 च्या विधानसभेत युती तुटताच ही जागा मोदी लाट असतांना देखील जिंकून दाखवली. पूर्व विदर्भात शिवसेनेनं जिंकलेली ही एकमेव जागा आहे हे विशेष. मात्र 2019 मध्ये भाजप-सेनेत युती होणार याचे संकेत मिळताच बाळू धानोरकर यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश करून चंद्रपूर लोकसभा सर्वांना धक्का देत जिंकून दाखवली.
बाळू धानोरकर म्हणजे शिवसेना हे मतदार संघात समीकरण असल्यामुळे ते काँग्रेस पक्षात गेले आणि शिवसेना इतिहास जमा झाली. त्यामुळे युतीत यावेळी भाजप ही जागा कुठल्याच परिस्थितीत शिवसेनेला देणार नाही हे स्पष्ट आहे. भाजपकडून या वेळी माजी कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे. 2014 च्या विधानसभेत काँगेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे संजय देवतळे यांनी ऐन वेळेवर भाजपमध्ये प्रवेश केला मात्र त्यांचा अवघ्या 2 हजार मतांनी पराभव झाला. संजय देवतळे यांचा मतदारसंघात मोठा जनाधार असल्यामुळे भाजप पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वात विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे.
भाजपमध्ये उमेदवारी बाबत कुठलाच गोंधळ नसला तरी काँग्रेस मध्ये मात्र उमेदवारी वरून चांगलाच खल सुरु आहे. खासदार बाळू धानोरकर हे प्रतिभा धानोरकर म्हणजे आपल्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताय तर दुसरीकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.विजय देवतळे आणि जि.प.सदस्य डॉ.आसावरी देवतळे यांनी काँग्रेसकडे उमेदवारीचा दावा केलाय. विजय देवतळे हे माजी मंत्री कै. दादासाहेब देवतळे यांचे चिरंजीव तर आसावरी देवतळे या त्यांच्या स्नुषा आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग या विधानसभा क्षेत्रात आहे. विजय देवतळे हे दादासाहेबांचे राजकीय वारस असून देखील त्यांच्यावर अन्याय झाल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. त्यामुळे यावेळी विजय देवतळे यांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. असं झाल्यास संजय देवतळे विरुध्द विजय देवतळे हा चुलत भावांमधला संघर्ष मतदारसंघात पाहायला मिळेल.
या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी आणि बसपा वरोरा मतदार संघात विशेष मतदान घेऊ शकली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षांना चांगलं मतदान होईल अशी शक्यता आहे. या दोन्ही आंबेडकरवादी पक्षांना मानणारा एक कॅडर बेस वोटर या भागात आहे आणि असं झाल्यास त्याचा फटका काँग्रेस ला बसू शकतो. वरोरा मतदार संघ हा ओबीसी बहुल मतदार संघ असून शेती आधारित अर्थव्यवस्था आणि निमशहरी तोंडवळा असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या भागात सिंचनाचे मोठे प्रकल्प नसले तरी जलशिवार योजनेच्या माध्यमातून या भागात बरीच कामं झाली आहेत. एखाद्या विशिष्ट मुद्द्यांवर निवडणूक केंद्रीत होईल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणं ज्याला सोडवणे जमेल तोच उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे.
विधानसभा 2014
बाळू धानोरकर ( शिवसेना )- 53,877
संजय देवतळे (भाजप ) - 51,873
डॉ. आसावरी देवतळे ( कॉंग्रेस ) - 31,033
भूपेंद्र रायपुरे (बसपा)- 18,759
लोकसभा 2019
बाळू धानोरकर (काँग्रेस) 88627
हंसराज अहिर (भाजप) 76167
राजेंद्र महाडोळे ( बहुजन वंचित) 11788
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान