मुंबई : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय आस्थापनांच्या समोर कांदा निर्यातबंदीविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले.


बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी दूध भुकटी आयात केली. आता कांद्याची निर्यात थांबवली. केंद्र सरकारचे निर्णय अनाकलनीय आहेत. म्हणून आज राज्यभर आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले.


कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक, उदयनराजे भोसले यांचा सरकारला घरचा आहेर


कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध 


केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  कांदा निर्यात बंदीमुळे भाव पडले तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला गंभीर विश्वासघात अशी प्रतिक्रिया किसानसभेचे सरचिटणीस, अजित नवले यांनी दिली. केंद्र सरकार ची भूमिका दुटप्पीपणाची आहे.  कांदा निर्याती बंदीच्या केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल, असं खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.


कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकऱ्यांचा रास्तारोको; राजकीय नेत्यांचाही विरोध



केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी


केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय म्हणजेच डीजीएफटीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात 30 ते 40 रुपये किमतीने कांद्यांची विक्री होत आहे.  बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. कोरोना संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 19.8 दशलक्ष डॉलर्स कांद्याची निर्यात केली आहे.


केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अजित नवले यांचा आरोप


कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा - खासदार उदयनराजे 


केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्याबाबतचं पत्रक त्यांनी काढलं आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पत्रकात त्यांनी स्पष्ट उल्लेख करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णय चुकीचा असल्याचं सांगताना याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी लॉकडाऊनमुळे बॅकफुटवर गेला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्रकात केली आहे.