Crop Damage Due To Rain : देशातील शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहेत. सध्या हवामान बदलाचा (Climate Change) शेती पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात (Maharashtra) कधी थंडीचा कडाका तर कधी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे. गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.  


गतवर्षी खरीप हंगामात पूर आणि पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस सोयाबीन पिकांसह फळबागांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. यामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सध्या देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी दव आणि पावसामुळं यामुळं पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. 


महाराष्ट्रातही बदलत्या हवामानाचा पिकावर परिणाम 


महाराष्ट्रात देखील बदलत्या हवामानाचा पिकावर परिणाम होत आहे. येथील कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पपईचे पीकही बुरशीजन्य रोगामुळं उद्ध्वस्त होत आहे. अशातच पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळं हवामानातील आर्द्रता वाढली आहे. हवामानात जास्त आर्द्रता राहिल्यास पिकांवर रोगराई निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जास्त थंडीमुळं बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, धुळे यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी चिंतेत आहेत. कारण या हवामानाचा पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता


राज्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी आदी पिकांची पेरणी झाली आहे. कांदा उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे. सध्या राज्यातील अनेक भागात कांद्याची पेरणी सुरू आहे. अशात हवामानात बदल होत असल्यामुळं कांदा पिकावर कीड आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय गहू, हरभरा, मोहरी या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. 


शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला


सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळं आणि पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. तसेच उत्पन्नात मोठी घट होत आहे. यामुळं शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि रोगराईमुळं अनेक भागात पिके वाया  गेली होती. त्यामुळं शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामातील पिकांकडे होती. परंतू, वारंवार बदलत असलेलं वातावरणामुळं पिकांवर अनेक विषाणूजन्य रोग पडत आहे. त्यामुळं शेककरी चिंतेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : पावसानंतर आता दाट धुक्याची चादर, पिकांवर रोगराई पडण्याची भीती; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत