नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात रामगढमध्ये 25 लोकांच्या जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. तर तीन ते चार लोकांना जखमी केले आहे. शेख इकबाल असे मृताचे नाव आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास हातात लाठ्या -काठ्या आणि तीक्ष्ण शस्त्रं घेतलेल्या सुमारे 25 लोकांच्या जमावाने शेख इकबाल यांच्या घरावर हल्ला केला. सुरुवातीला जमावाने घरात जोरदार तोडफोड केली आणि त्यानंतर 50 वर्षीय शेख इकबाल यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. हल्लेखोरांनी शेख इकबाल यांच्या आई आणि बहिणीलाही जखमी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इकबाल यांच्या भाच्याचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. दोघेही तरुण तरुणी सज्ञान होते आणि 2 मार्च रोजी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. नुकतेच दोघे कामठीला परतले होते. त्याच वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आणि विशेषत्वाने काल संध्याकाळपासून दोन्ही पक्षात धुसफूस सुरु होती. संध्याकाळी ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा पोलिसांनी आवश्यक कारवाई करत गुन्हा टाळण्याचे प्रयत्न केले नाही. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास वाद विकोपाला जाऊन यात एकाचा जीव गेला.