पुणे- पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर जमीन बळकावल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती दीक्षित या महिलेची जमीन बनावट विकसन करारनामा आणि बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन लाटल्याचा आरोप दीपक मानकर अणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर आहे.


दीक्षित यांची विमाननगर, लोहगाव आणि पुणे शहरात वडिलोपार्जित जमीन आहे. संगीताचे कार्यक्रम करणाऱ्या आदिती दीक्षित कामाच्या निमित्ताने अनेकदा परदेशात असतात. त्याचा फायदा घेऊन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न दीपक मानकर आणि त्यांची सहकारी साधना वर्तक यांनी केला, असं दीक्षित यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

दीपक मानकर यांच्यावर गेल्या आठवड्यात कोथरूड आणि हडपसर पोलिस स्टेशनमध्ये देखील गुन्हे नोंद झाले आहेत.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर सध्या तुरुंगात आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मोक्का लावला आहे. एकापाठोपाठ एक दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमुळे मानकर यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईला बळ मिळणार आहे.

दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस त्यांना येरवडा कारागृहातही जावं लागलं होतं.