वर्धा : अयोध्येत हिंदू, मुस्लीम तसंच बौद्धांनाही जागा द्यावी. हिंदुंनी मंदिर बांधावं,  मुस्लिमांनी युनिर्वसीटी बांधावी, आम्ही बौद्ध मंदिर बांधू, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्धा येथे केले. राम मंदिराच्या जागेचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. काही लोकांचं म्हणणे आहे ही जागा बुद्ध मंदिराची आहे. अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाच मंदिर होते. ते पाडून राम मंदिरं बांधलं. ते पाडून मस्जिद बांधण्यात आली. हिंदू धर्म मोठा असल्याने त्यांना जास्त जागा द्यावी. काही भाग मुस्लिमांना द्यावा, काही भाग आम्हाला द्यावा, असा मधला पर्याय काढून न्याय द्यावा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य राहील असेही आठवले म्हणाले.


आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर माझा विरोध का करतात हे मला कळत नाही. ते बाबासाहेबांचे नातू आहे. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. मी सत्तेत मंत्री होण्यासाठी आलो, असे जर ते म्हणत असतील तर ते एमआयएममध्ये कशासाठी गेले, ते सांगावे, असंही ते म्हणाले. एमआयएममध्ये गेल्यानं त्याचा फायदा भाजपला होऊन काँग्रेसला फटका बसणार असल्याचे देखील ते म्हणाले.  आंबेडकर आणि ओवेसी यांनी एकत्र येवून दलित मते त्यांच्यासोबत आहे, असं समजू नये. सर्वाधिक दलित मत माझ्यासोबत आहे, असंही आठवले यांनी स्पष्ट केले.

पवारांनी एनडीएमध्ये यावे, उपपंतप्रधान बनविण्यासाठी प्रयत्न करू
एकट्या मोदींचा सामना करण्यासाठी विरोधक एकवटले. शरद पवार, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला असे विरोधक मोदींचा एकट्याचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहेत. ते एकत्र येऊन आमच्या मागे लागल्यास आम्ही त्यांच्या मागं लागू, असं सांगत भाजपला पुढच्या निवडणुकीत कसलीच अडचण येणार नाही, असं आठवले म्हणाले.  शरद पवार यांना पंतप्रधान बनविण्यासाठी राहुल गांधी पाठिंबा देऊ शकत नाहीत. राहुल गांधी यांच्या 60 ते 70 जागा येतील. पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आणि पवारांच्या जागा 5 ते 6 च्या वर जाणार नाहीत. त्यामुळे काहीही केले तरी पंतप्रधान होणार नाही. त्यांनी एनडीएमध्ये यावे उपपंतप्रधान बनविण्यासाठी प्रयत्न करू, असेही म्हणाले.

दलित पँथर आंदोलन हिंसक नव्हतं, पण लोकांना भिती वाटायची
दलित पँथर आंदोलन हिंसक नव्हतं पण लोकांना भिती वाटायची, असंही ते म्हणाले. आम्ही हक्क मागतो. तुमचा हक्क तुम्ही घ्या, पण आमचा हक्क आम्हाला द्या, आमच्याही हक्काचं तुम्ही खाल तर आम्ही काय करायचं, असा प्रश्न आठवलेंनी उपस्थित केला. दलितांवर आजही अत्याचार होतो. भाजपंच सरकार आलं म्हणून अत्याचार होतो, हे म्हणणे योग्य नाही. काँग्रेसच्याही काळातही अत्याचार व्हायचे, असं ते म्हणाले. सरकार आरक्षणाला धक्का लावणार नाही, जे आरक्षणाला धक्का लावतील त्यांचा सत्यानाश होईल, असा शापच त्यांनी दिला.

मायावती रिपाइंत येणार नाही मी बसपात जाणार नाही. मायावती रिपाइंत आल्यास त्यांना अध्यक्ष करू असेही ते म्हणाले.