अहमदनगर : शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या संपामध्ये उभी फूट पडल्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर एका गटाने संपातून माघार घेतली आहे. तर दुसरा गट मात्र संपावर ठाम आहे.
पुणतांबा गावातील एका गटाने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजकीय नेते आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांचा नियोजित संप होणार असल्याचं किसान क्रांती संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 3 एप्रिल रोजी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटले.
सुरुवातीला अहमदनगर आणि औरंगाबाद येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या आंदोलनाची दिशा ठरवली आणि राज्यभरातील अनेक शेतकरी या संपात सहभागी होणार, असं चित्र निर्माण झालं. यासाठीच राज्यव्यापी अशा किसान क्रांतीच्या माध्यमातून संघटनेची स्थापनाही करण्यात आली होती.
मात्र काल अचानक पुणतांबा गावातील शेतकऱ्यांमध्ये आंदोलनावरून फूट पडली. पुणतांबा गावातील एका गटाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संप स्थगित करण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे पुणतांबा गावासह राज्यभरातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं सांगितलं. राजकीय नेते आमच्या आंदोलनात फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.