कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 15 प्रवासी झाले आहेत. जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्त एसटी कोल्हापूरहून कोदेकडे निघाली होती, तर दुसरी एसटी गगनबाड्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर लोंघे गावाजवळ महादेव मंदिराच्या वळणावर दोन्ही एसटींची धडक झाली.
जोरदार पावसामुळे एसटी चालकांना समोरील काही न दिसल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातात 65 वर्षीय बेबी बाळू मुल्लानी यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर बसमधील जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर कोल्हापूर-गगनबागठा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पोलीस अपघाताची अधिक चौकशी करत आहेत.