नागपूर : मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. जर मल्टिप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालत असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारने विधीमंडळात आज स्पष्ट केलं आहे.


मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ्यांच्या वाढीव किमती आणि बाहेरील खाद्यपर्थांवरील बंदीच मुद्दा आज विधीमंडळात चर्चेला आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी सादर केली. धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधीला अन्न पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नाही आणि मल्टिप्लेक्स मालकांनी असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.


याशिवाय एकाच वस्तूची दोन ठिकाणी वेगवेगळी किंमत असू शकत नाही. एक ऑगस्टपासून यासंबंधीचा केंद्राचा कायदा लागू होत आहे. अधिवेशनानंतर या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.


उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न


मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे अव्वाच्या सव्वा दर आणि बाहेरील खाद्यपदार्थांवरील बंदी यावर उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते.
- मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्या सव्वा किमतीत का विकले जातात?
- बाहेरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत, तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते?
- सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी असेल तर मग सरसकट सगळ्याच अन्नपदार्थांना मल्टीप्लेक्समध्ये बंदी का नाही?


मल्टिप्लेक्सविरोधात मनसेची आंदोलने
जैनेंद्र बक्षी यांनी सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं बाहेर पाच रुपयांत मिळणारे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांना विकलं जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेनं मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील इतर ठिकाणी आपल्या स्टाईलमध्ये आंदोलनं केली होती.