शिर्डी : साई बाबांच्या शिर्डीमध्ये सध्या चमत्काराची चर्चा रंगली आहे. द्वारकामाई मंदिरातील भिंतीवर साईबाबांची प्रतिमा दिसल्याचा दावा साई भक्तांनी केला. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांची प्रतिमा उमटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


बुधवारी रात्री मंदिर सफाई करताना स्थानिक ग्रामस्थांना साईबाबांची प्रतिमा भिंतीवर दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी शिर्डीत पसरली. त्यानंतर भिंतीवर उमटलेली साईबाबांची प्रतिमा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी साई भक्तांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी यावेळी फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये शुट केले. आता हे फोटो फेसबुक, व्हॉटसअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

द्वारकामाईचं महत्त्व
साईबाबा शिर्डीत आले त्यावेळी पडक्या मशिदीमध्ये राहत होते. साई बाबा या मशिदीला 'द्वारकामाई' म्हणत असत. द्वारकामाईत साईबाबा भिंतीला पाठ लावून बसत असत. साईबाबांनी आपल्या हयातीत याच द्वारकामाईत अनेक चमत्कार केल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे शिर्डीच्या या द्वारकामाईचं वेगळं महत्त्व आहे.

साईबाबांनी कधी पाण्याने दिवे लावले, तर कधी भाविकांना वेगवेगळ्या रुपात दर्शन दिल्याचा दावा भाविक करतात. बाबांनी आपल्या हातानं पेटवलेली धुनी आजही या द्वारकामाई मंदिरात जळत असल्याचीही भाविकांची श्रद्धा आहे. या धुनीतून निघणार्‍या राखीची उदी बनवून साई संस्थान भाविकांना साई प्रसाद म्हणून देत आहे.