सांगली : सांगलीतील इस्लामपुरात चलनातून बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्‍त केल्या आहेत. नोटाबंदी होऊन दोन वर्षाहून अधिक कालावधी झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा बदलून घेण्यासाठी नेल्या जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.


सांगलीच्या  इस्लामपूर शहरात चलनातून बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्‍त केल्या आहेत. याप्रकरणी चौघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केले आहे. या नोटा बदलून घेण्यासाठी नेल्या जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देण्याची टोळी सक्रीय असल्याचा पोलिसांना संशय आहे.

नोटाबंदी होऊन दोन वर्षाहुन अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील  चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देण्याचा गोरखधंदा अजूनही सुरु असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.

इस्लामपूर येथे काहीजण चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.  चलनातून बाद झालेल्या 99 लाख 97 हजार 500 रुपये किंमतीच्या या नोटा आहेत.

त्यामध्ये 500 आणि एक हजार रुपयांच्या 99 लाख 97 हजार 500 रुपये किंमतीच्या नोटा आहेत. या नोटासंह एक मोटारसायकल, तीन मोबाईल हॅण्डसेट असा 1 कोटी 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी नेण्यात येत असल्याचे अटक केलेल्या संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे. एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 25 लाख रुपयांचे नवे चलन मिळणार होते. यातील 20 लाख ज्याची रक्‍कम आहे त्या व्यक्तीला आणि 5 लाख रुपये मध्यस्थी करणार्‍यांना मिळणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही एवढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आहे आणि नोटाबंदी होऊन वर्ष उलटले तरी आता या नोटा बदलून घेण्याचा उद्योग कोण चालवत आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.