मुंबई: आजचा दिवस जगाच्या आणि देशाच्या इतिहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अन्वर सादत यांची अरब कट्ट्ररवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच 6 ऑक्टोबर 1927 रोजी जगातील पहिला बोलपट प्रदर्शित करण्यात आला होता. जाणून घ्या आजचा दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे. 


1860 - भारतीय दंड संहिता कायद्याला मंजुरी 


ईस्ट इंडिया कंपनीला भारतात कारभार करण्यासाठी एका कायदेशीर नियमावलीची गरज होती. त्यामुळे मॅकेलेने 1834 साली भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) तयार केली. 6 ऑक्टोबर 1960 रोजी हा कायदा पारित करण्यात आला आणि 1 जानेवारी 1962 रोजी या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. आजही भारतात हाच कायदा लागू आहे. 


1927- जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित 


जागतिक सिनेमाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असून 6 ऑक्टोबर 1927 रोजी अमेरिकेत जगातील पहिल्या बोलपटाचे प्रदर्शन करण्यात आलं. 'द जॅज सिंगर' असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट न्यूयॉर्क या ठिकाणी सर्वप्रथम प्रदर्शित करण्यात आला. वॉर्नर ब्रदर्सकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. भारताचा विचार केला तर 14 मार्च 1931 रोजी भारतात पहिला बोलपट प्रदर्शित करण्यात आला होता. आलम आरा हा पहिला  बोलपट मुंबईतील मॅजिस्टिक सिनेमा हॉल या ठिकाणी रिलीज करण्यात आला. 


1946- विनोद खन्ना यांचा जन्म 


भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर या ठिकाणी झाला होता. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर गुरुदासपूर या ठिकाणाहून ते लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी देशाच्या संरक्षण राज्यमंत्रीपदीही काम केलं आहे. 


1949- खडकवासला येथे एनडीए संस्थेची पायाभरणी 


नॅशनल डिफेन्स अॅकडमी म्हणजे एनडीए संस्थेची पायाभरणी आजच्या दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबर 1949 रोजी करण्यात आली. एनडीए ही संस्था भारतीय लष्करातील तीनही क्षेत्रातील अधिकारी तयार करण्याचं, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कल्पनेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या पायाभरणीचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला होता. 


1954- देशात राष्ट्रीय आरोग्य योजना सुरू


भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी 6 ऑक्टोबर 1954 रोजी देशात राष्ट्रीय आरोग्य योजना लागू करण्याची घोषणा केली. 


1974- व्ही के मेनन यांचं निधन 


स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणातील बडे नेते व्ही. के. मेनन यांचे 6 ऑक्टोबर 1974 रोजी निधन झालं. 1957 ते 1962 या काळात भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. 1962 साली चीनसोबत झालेल्या युद्धामध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 


1981- इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अन्वर सादत यांची हत्या


इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आणि अलिप्ततावादी चळवळीचे नेते मोहम्मद अन्वर सादत (Mohammad Anwar Sadat) यांची 6 ऑक्टोबर 1981 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  मोहम्मद अन्वर सादत यांनी 1970 साली इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. असं सांगितलं जातंय की सादत यांनी स्वत:च्या डेथ वॉरंटवर सही केली होती. 


इस्त्रायलसोबतचा वाद मिटवून त्याच्यासोबत शांततेचा करार करणारा इजिप्त हा पहिलाच अरब देश होता. मोहम्मद अन्वर सादत यांनी हा करार केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे अरब देशांमध्ये असंतोष पसरला होता तर जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कट्ट्ररवाद्यांना त्यांचा हा निर्णय पटला नाही. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. 


मोहम्मद अन्वर सादत यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत अलिप्ततावादी भूमिका घेतली होती. इस्त्रायलसोबत केलेल्या शांती करारानंतर त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.