On This Day In History :  महात्मा गांधी यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्य चळवळीत योगदान असणाऱ्या कस्तुरबा गांधी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, स्पेनने फ्लोरिडा प्रांत अमेरिकेला विकला. जाणून घ्या आजच्या दिवसातील इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी...



1732 : जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म 


अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले होते.  अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून इ.स. १७८९ साली त्यांची एकमुखाने निवड झाली. अमेरिकेच्या लोकप्रिय राष्ट्राध्यक्षपदांपैकी एक आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीवर त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. 


1819: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला 50 लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला. 


1819 मध्ये अमेरिका आणि स्पेन यांच्यात करार झाला. या करारानुसार, स्पेनने फ्लोरिडा प्रांत अमेरिकेला दिला. अमेरिका आणि न्यू स्पेन यांच्यातील सीमारेषा निश्चित आहे. या कराराने दोन देशांमधील सीमा वाद मिटवला आणि हा अमेरिकन मुत्सद्देगिरीचा विजय मानला जातो. फ्लोरिडा हा प्रांत स्पेनसाठीदेखील ओझं झालं होतं. स्पॅनिश सरकारने स्पॅनिश टेक्सासमधील सॅबिन नदीच्या किनारी असलेल्या सीमा विवादावर तोडगा काढण्याच्या बदल्यात हा प्रदेश युनायटेड स्टेट्सला देण्याचा निर्णय घेतला. 


1857: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म


स्काउट व गाइडचे जनक समजले जाणारे बेडन पॉवेल यांचा जन्म. बोअर युद्धादरम्यान, बॅडेन-पॉवेलने "स्काउटिंगसाठी मार्गदर्शक" लिहिले. हे 1908 मध्ये प्रकाशित झाले होते. ऑगस्ट 1907 मध्ये, बेडन पॉवेल यांनी विविध प्रकारच्या सामाजिक पार्श्वभूमीतील 20 मुलांचा समावेश करून एक प्रायोगिक तत्वावर स्काउटिंग शिबिर आयोजित केले. मुलांनी ब्राउनसी बेटावर एक आठवडा घालवला. हे शिबीर चांगलेच यशस्वी ठरले. त्यानंतर हळूहळू स्काउटिंग चळवळ ही एक आंतरराष्ट्रीय संघटना बनली आणि जगभरात स्काउटिंग गट तयार झाले.


1920: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म


बॉलिवूड चित्रपटांमध्ये पोलिसांचा कणखर चेहरा अशी ओळख मिळालेले चरित्र अभिनेते इफ्तिखार यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जालंधर येथे जन्म झाला होता. 1944 मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. फाळणीनंतर इफ्तिखार यांचे कुटुंब, भाऊ पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झाले. तर, इफ्तिखार यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद यासारख्या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या होत्या. 1967 मधील अमेरिकन टीव्ही मालिका 'माया'मधील दोन भागांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. 


1925 : डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन


थर्मामीटरचा शोध लावणारे ब्रिटनमधील डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. ब्रिटनमधील वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. 1866 मध्ये त्यांनी क्लिनिकल थर्मामीटरचा शोध लावला. सहा इंचाच्या थर्मामीटरमध्ये पाच मिनिटात तापमानाची नोंद केली जात होती.


1944 : कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन


कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. कस्तुरबा गांधी यांना 'बा' असे संबोधले जात असे. महात्मा गांधी यांच्यासोबत विवाह झाला तेव्हा निरक्षर होत्या. मात्र, गांधीजींनी त्यांना लिहिण्यास-वाचण्यास शिकवले. गांधीजींनी यांनी 1906 मध्ये ब्रह्मचर्य पालनाचा निर्णय घेतला तेव्हा कस्तुरबा गांधी यांनी त्यांना साथ दिली. महात्मा गांधी यांच्या बरोबरीने त्या देखील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेत 1913 मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना तीन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. 


1958 :  स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन


मौलाना अबुल कलाम आझाद हे एक भारतीय प्रमुख राजकीय नेते होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे होते. अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना मिळाले. त्यांनी विविध देशांचा दौरा केला होता. वृत्तपत्रेही काढली होती. आझाद यांच्या वृत्तपत्रातून ब्रिटिशांवर टीका होत असल्याने त्यांच्यावर ब्रिटिश सरकारने निर्बंध लादले होते. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अबुल कलाम हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. 


2009: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन


मराठीतील बहुरंगी लेखक, नाट्यदिग्दर्शक आणि अभिनेते प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन झाले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते.  'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकामुळे त्यांचे नाव  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले.