On This Day In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या.  इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतांना पक्षातून बडतर्फ केलं होतं तर  तिकडे ऑस्ट्रिया हा गणतांत्रिक देश याच दिवशी बनला होता. पक्षीप्रेमी सलीम अली, गब्बर सिंह अर्थात अमजद खान, 'सेनापती' बापट, एसेम जोशी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. तर केशवराव जेधे, मधू दंडवते, मदन मोहन मालवीय यांसारख्या दिग्गजांचा मृत्यू आजच्याच दिवशी झाला होता. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1918 : ऑस्ट्रिया हा देश गणतांत्रिक देश बनला 
साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रिया हा देश गणतांत्रिक देश बनला. ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रूपांतर झपाट्याने पहिल्या महायुद्धात झाले. 1918 मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. 
 
इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतांना पक्षातून बडतर्फ केलं


1967: साली आजच्याच दिवशी इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली.   अखेर 1967 च्या निवडणुकात काँग्रेसचे 60जागांचे नुकसान झाले. 545  पैकी 297 जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर 1969 मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून इंदिरा गांधींनी शासन वाचवले.


1956: आजच्याच दिवशी 1956 साली मोरक्को, सुदान आणि ट्युनिशिया हे देश संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेत समाविष्ट झाले होते.


 पक्षीप्रेमी सलीम अली यांचा 1896 साली जन्म 
1896 : प्रसिध्द भारतीय पक्षीप्रेमी सलीम अली यांचा 1896 साली जन्म झाला होता.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षी तज्ञ.  त्यांचे कार्य पक्षी विज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सलीम अली यांचा जन्म मुंबई मध्ये मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली असे होते. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे व त्यानंतर दोन वर्षांनी आईचे निधन झाले. त्यांचे मामा अमीरूद्दीन तय्यबजी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचा पक्षी अभ्यास खूप मोठा होता, त्यावर त्यांनी अफाट लेखन केलं. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे किताब दिले, तसेच त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. तमिळनाडू राज्यात कोईमतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी ( SACON ) ही संस्था सुरू करण्यात आली आहे.  
 
गब्बर सिंह अर्थात अमजद खान यांचा जन्म


आजच्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेते अमजद खान यांचा 1940 साली जन्म झाला होता. सुमारे वीस वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये त्यांनी  130 चित्रपटात काम केले. त्यांच्या 1975 सालच्या शोले या चित्रपटातील गब्बर सिंह या पात्रानं त्यांना अजरामर केलं. मुकद्दर का सिकंदर यासह अनेक हिंदी चित्रपटातली खलनायकाच्या भूमिकांमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.


1946  : मदन मोहन मालवीय यांचा मृत्यू 


महान स्वतंत्रता सेनानी व समाज सुधारक मदन मोहन मालवीय यांचा आजच्याच दिवशी 1946 साली मृत्यू झाला होता. मालवीय यांचा जन्म पंडित बैजनाथ आणि मुना देवी मालवीय यांच्या ब्राह्मण कुटुंबात 25 डिसेंबर 1861 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्वज मूळचे सध्याचे मध्य प्रदेशातील मालवा (उज्जैन) येथील होते आणि म्हणूनच त्यांना मालवीय म्हणून ओळखले जाऊ लागले.मालवीयांनी भारतीयांमध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी  काम केलं. त्यांनी वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली.    


1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. 15 सप्टेंबर 2002 पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.


2000: 12 नोव्हेंबर हा दिवस ’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.


1880: 'सेनापती' बापट यांचा जन्म


सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव तथा 'सेनापती' बापट  यांचा जन्म आजच्याच दिवशी 1880 साली झाला होता. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1967 साली झाला. 
 
1904 :  समाजवादी, कामगार नेते एस. एम. जोशींचा जन्म
 समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1904 साली झाला. ते एक निष्ठावंत समाजवादी नेते व कामगार पुढारी. ‘एसेम’ या नावाने ते परिचित आहेत. त्यांचा जन्म जुन्नर (पुणे) येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. काही आंदोलनांमध्ये त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली. या काळात त्यांनी मार्क्सचे विचार व समाजवाद यांचा अभ्यास केला आणि ते समाजवादी बनले.  त्यांनी विपुल प्रमाणात लिखाण देखील केले आहे. 1957 मध्ये ते मुंबई विधानसभेवर निवडून आले आणि 1963 मध्ये प्रजा सामाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. पुढे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली.
  
1959 : केशवराव मारुतराव जेधे यांचा मृत्यू


स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा आजच्याच दिवशी 1959 साली मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 9 मे 1886 रोजी झाला होता. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय जेधे यांना द्यावे लागेल.  अस्पृश्यांच्या अनेक चळवळींत त्यांनी भाग घेतला. राजकारणात असूनही त्यांनी या नात्याने विपुल लेखन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते.


२००५: प्रा. मधू दंडवते यांचा मृत्यू 


समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते यांचा मृत्यू आजच्याच दिवशी 2005 साली झाला. समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती. 1971 ते 1990 एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1978 साली जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री, 1989 साली व्ही. पी. सिंग सरकारमध्ये अर्थमंत्री आणि 1990 साली देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय दंडवतेंनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरीब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात.