जळगाव : अंत्यविधीदरम्यान मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत झाडलेली गोळी लागून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमधल्या धरणगाव तालुक्यातील पिंप्री या गावात ही घटना घडली आहे. तुकाराम वना बडगुजर (60)असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव असून ते पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावचे रहिवासी होते.
अंत्यविधीदरम्यान बंदुकीने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिसरी गोळी झाडण्याच्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेला आलेल्या तुकाराम बडगुजर यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर हवेत गोळ्या झाडण्याची परवानगी होती का? अशा पद्धतीने कोणत्याही मृतास मानवंदना देता येते का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. परंतु अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (वय ८५) यांचे आज (शनिवार) वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. यावेळी श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्यासाठी विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दीपक याने बंदुकीमधून हवेत फायर केले.
दीपकने दोन गोळ्या व्यवस्थित झाडल्या. परंतु तिसऱ्या फायरिंगच्या वेळी बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक बंदूक आडवी करून तपासत असतानाच बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अंत्ययात्रेला आलेल्या तुकाराम बडगुजर यांना लागली. त्यानंतर जखमी बडगुजर यांना त्वरित जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अंत्यविधीदरम्यान मानवंदना देण्यासाठी झाडलेल्या गोळीने वृद्धाचा मृत्यू
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
11 May 2019 11:11 PM (IST)
अंत्यविधीदरम्यान मृताला मानवंदना देण्यासाठी हवेत झाडलेली गोळी लागून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -