Ola Ober Rapido: ओला, उबर, रॅपिडोसारख्या कॅब चालकांना आता गर्दीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट आकारणी करण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिलाय. यावरून सध्या नवा वाद उफाळला असून या निर्णयामुळे सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे . महाराष्ट्राचे परिवहन मंत्री यांनी रॅपिडोच्या बाईकला आपण महाराष्ट्रात परवानगी दिली नाही .तरी देखील रॅपिडो सेवा सुरू आहे असं सांगत ओला, उबर, रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .
गर्दीच्या वेळी दुप्पट भाडं आकारण्याची परवानगी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जुलै रोजी नवे नियम लागू केले .यात ओला उबर रॅपिडोसारख्या कॅब चालकांना गर्दीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट भाडं आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे .आतापर्यंत वर्दळीच्या वेळेसाठी आधार भाड्याच्या दीडपट भाडं आकारण्यास परवानगी होती . दुसरीकडे गर्दी नसलेल्या वेळेत किमान कॅबचलकांना भाड्याच्या 50% भाडे आकारणे अनिवार्य केले आहे.
डेड मायलेज भरून काढण्यासाठी किमान तीन किलोमीटरचे मूळ भाडे आकारले जाईल .यामध्ये प्रवासी नसताना कापलेले अंतर आणि प्रवाशांना पिकअप करण्यासाठी कापलेले अंतर, यासाठी वापरले जाणारे इंधन याचा समावेश असेल असे सांगण्यात आले आहे . देशातील सर्व राज्यांना पुढील तीन महिन्यात ही सुधारित मार्गदर्शक तत्वे लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे . त्यामुळेच आता पुढील तीन महिन्यात ओला उबेर सेवा अधिक महागणार हे जवळपास निश्चित झाले आहे .
स्थानिक रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये नाराजी
ओला उबर रॅपिडोसारख्या ॲपमुळे स्थानिक रिक्षा,टॅक्सी चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे .अनेक ठिकाणी पारंपरिक रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचा ॲप आधारित टॅक्सी कॅब सेवा चालकांशी वाद असल्याचंही दिसून येतं . अनेक ग्राहकांकडून ॲप आधारित कॅब व टॅक्सी सेवांमधून ग्राहकांची लूट होत असल्याचे आरोप केले जातात . दरम्यान कोणतीही परवानगी नसताना महाराष्ट्रात ओला, उबर रॅपिडोच्या बाईकसेवा सुरू आहेत . कोणत्याही नियमावलीचा पालन न करता हे वाहन चालक गाड्या चालवतात .त्यामुळे ओला उबर रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले .
ओला उबर रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
" ओला उबर रॅपिडो महाराष्ट्रात काम करत आहेत .प्रत्येक राज्यात त्यांचा ॲप सुरू आहे .आपण महाराष्ट्रात बाईकला परवानगी दिली नाही .परंतु तरीदेखील रॅपिडो सेवा सुरू असल्याचे पाहायला मिळालं .मी स्वतः रॅपिडो बाईक बुक केली .राज्य सरकारने परवानगी दिली नसतानाही वाहतूक सुरू आहे .त्याने कोणत्याच नियमाचे पालन केले नव्हते .यात त्या ड्रायव्हरची चूक नाही तर त्या कंपनीची आहे .ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्यापेक्षा कंपनीवर गुन्हा दाखल करावा असे मी सांगितले आहे .ते कोणालाही स्पॉन्सरशिप दिली म्हणजे त्याने विकत घेतले नाही .चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणार नाही . रिक्षा चालक टॅक्सी चालक यांनी नियमावलीचे पालन केले नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले .
हेही वाचा