बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर संघर्ष सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी (Ravikant Tupkar on Raju Shetti) लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवताना अडीच लाखांवर मते घेतली होती. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापूर्वी विचार करावा, अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली आहे. 


माझ्यावर काय समिती नेमायची ती नेमावी


लोकसभेचा पराभव आपण स्वीकारला असून अपयशाचा बाप होण्यास तयार असल्याचेही रविकांत तुपकर यांनी सांगितले. त्यामुळे चुका दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचं असल्याचं तुपकर म्हणाले. शेट्टी यांना थेट आव्हान देताना माझ्यावर काय समिती नेमायची ती नेमावी, आम्ही लोकसभा निवडणुकीत अपक्ष असूनही पक्षापेक्षा जास्त मते घेतली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. 


मी काय दरोडा टाकला आहे का?


उठलं सुटलं मला नोटिसा पाठवतात आणि पुण्याला हजर व्हा म्हणतात, मी काय दरोडा टाकला आहे का? अशी विचारणा रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी बुलडाणामधील सहाच्या सहा विधानसभा जागा लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून फारकत घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


तर निवडणूक हिंदू मुस्लिम झाली असती


तुपकर म्हणाले की मी इमानदारीने वागतो म्हणून माझ्यासोबत 22 वर्षांपासून लोक टिकून आहेत. अनेक नेते आमदार म्हणतात की आपल्याला तुपकर सारखं करायचं आहे. ते पुढे म्हणाले की मी जर लोकसभा निवडणूक लढवली नसती तर निवडणूक हिंदू मुस्लिम झाली असती. माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आल्याने आता अर्थसंकल्पात पण आपण आलो असल्याचे रविकांत उपकर म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या